www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मनसेच्या नाशिकमधील नगरसेवकांची मुंबईत झाडाझडती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये येणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुणे दौरा होतोय. मात्र, या दौऱ्यात ते पुण्यातले नगरसेवक तसंच पदाधिकाऱ्यांची हजेरी घेणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मनसेतला पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. विविध पदांच्या नियुक्तीवरून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यालयात राडा घातल्याची घटनादेखील घडली होती. या विषयासह महानगरपालिकेतील पक्षाची कामगिरी तसंच आगामी निवडणुकांच्या तयारी विषयी राज ठाकरे चर्चा करणार असल्याचं कळतंय.
आज दुपारनंतर राज ठाकरे पुण्यात येणार असून उद्या ते नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत काय घडतं याविषयी उत्सुकता आहे. राज ठाकरेंचा पुणे मुक्काम दोन ते तीन दिवस चालणार असल्याचीही माहिती आहे...
नाशिकमध्ये `मनसे` काम का नाही?; राज ठाकरेंचा सवाल
नाशिक महापालिकेत सत्तेची दोन वर्ष पूर्ण केलेल्या महापौर आणि मनसे नगरसेवकांच्या कामांचं ऑ़डिट पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई केलं. कृष्णकुंजवर घेतलेल्या बैठकीत महापौर यतीन वाघ यांची राज ठाकरेंनी चांगलीच खरडपट्टी काढली.
विधायक कामांवर भर देण्याचा सूचना देऊन नगरसेवकांचीही झाडाझडती घेतली. मात्र राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांवर समाधान व्यक्त केल्याचा दावा मनसे गटनेते अशोक सातभाई यांनी केला. कामे होत आहेत. मात्र, ती जनतेपर्यंत पोहचत नसल्यामुळं राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं.
‘नाशिक पालिकेत सत्ता येऊन दोन वर्षे झाली, या काळात तुम्ही काय केले? तुमच्या अपयशाची उत्तरे लोकांना काय मी द्यायची का?,’ असा सवाल करत राज यांनी सर्व नगरसेवकांना चांगलेच फैलावर घेतले. ‘आपण नवे म्हणून लोकांनी माझ्या विश्वासावर आपल्याला सत्ता दिली आहे. आणि तुम्ही कामे करण्याऐवजी जर कारणे देत असाल तर ते यापुढे चालणार नाही,’ असे सांगत सगळ्या नगरसेवकांना त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले.
काही नगरसेवकांनी आपण कशी कामे केली हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज म्हणाले, ‘जर कामे झाली असे म्हणता तर ती दिसत का नाहीत आणि माध्यमांमधून त्यांची चर्चा का होत नाही याचे उत्तर मला द्या?’ या प्रश्नावर सारेच नगरसेवक निरुत्तर झाले. या बैठकीत राज ठाकरेंनी महापौर यतीन वाघ व पक्षाच्या नगरसेवकांना चांगलेच सुनावून कामाला लागण्याचे आदेश काढले.
जनतेतून मनसेच्या कामांवर टीका होऊ लागल्यानं तसंच निवडणूक सर्व्हेक्षण चाचणीतून मनसेची राज्यात पीछेहाट झाल्यामुळं राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली होती. नुकत्याच झालेल्या राज ठाकरेंच्या दौऱ्यातही नाशिकच्या नगरसेवकांची राज ठाकरेंनी झाडाझडती घेतली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.