www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या शिवबंधनावर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे, धागे बांधून कुणी कुणाच्या बंधनात अडकत नसतं, यापेक्षा युवकांच्या जवळ जा आणि लोकांचे प्रश्न समजून घ्या, असा सल्ला आणि टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे.
मुंबईत नगरसेवकांच्या बैठका सुरू आहेत, यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या शिवबंधन कार्यक्रमावर जोरदार टीका केली.
शिवसेनेचा हा कार्यक्रम संपत नाही तेच राष्ट्रवादीने टीकास्त्र सोडले होते. राज्यात जादूटोणा कायदा लागू झाल्यामुळे धागेदोरे बांधून काही होणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या टीकेनंतर आता मनसेनंही टोला लगावलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सोमय्या मैदानावर लाखो शिवसैनिकांनी शिवबंधनाचा धागा बांधला. यावेळी बाळासाहेबांची जुनी ध्वनीफिती ऐकवण्यात आली.
बाळासाहेबांनी या अगोदर शिवसैनिकांना पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याची आणि निवडणुकीत भगवा फडकवण्याची शपथ दिली होती. तीच शपथ पुन्हा देण्यात आली. त्यानंतर उद्धव यांनी बाळासाहेबांचं स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञा दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत राज यांनी धागे बांधून कुणी-कुणाच्या बंधनात अडकत नसतं, असा टोला शिवसेनेला लगावला. त्यापेक्षा तरुणांच्या जवळ जा त्यांच्या समस्या समजून घ्या, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या आणि कामाला लागा असा सल्ला राज यांनी दिला.
या बैठकीत नवीन उपाययोजना तसेच आगामी विकासकामांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आता कंबर कसली आहे.
राज ठाकरे यांनी नाशिक दौरा आटोपून आल्यानंतर बैठकींचा धडाका लावलाय. या बैठकीत नगरसेवकांपासून ते आमदारांपर्यंत सगळ्यांची कानउघडणी केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.