दिनेश दुखंडे, www.24taas.com, मुंबई
नितीन गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गडकरी दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. या घटनेवर राज ठाकरेंनी पुन्हा आपलं मराठी कार्ड काढलं आहे. राज ठाकरे गडकरींच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत.
नितीन गडकरी भाजपचे पुन्हा अध्यक्ष न होणं हे अनपेक्षित होतं. भाजपमधीलच एक गट गडकरी बिनविरोध पुन्हा अध्यक्ष होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळेच, गडकरींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गडकरींना पाठिंबा दिला आहे.भाजपमधील घडामोडीवर राज ठाकरेंनी झी २४ तासकडे आपली प्रतिक्रिया दिली. गडकरी प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांच्यावर जेव्हा आयकर छापे टाकले, तेव्हाच त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळण्यास अडचण येणार, हे निश्चित झालं होतं. किंबहूना हे छापे म्हणजे गडकरींना पुन्हा अध्यक्षपद मिळू नये, यासाठीच केलेली तजवीज होती, असं राज ठाकरे म्हणाले.
दिल्लीला मराठी माणसाचं नेहमीच वावडं आहे. नितीन गडकरींनी पुन्हा भाजपचं अध्यक्ष होऊ नये, य़ासाठीच आयकर छाप्यांची व्यूहरचन दिल्लीमध्ये आखली गेली होती. आता राजीनामा दिल्यावर हे आयकर छापे बरोबर बंद होतील, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या पक्षांचे अध्यक्षपद संभाळत असूनही राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची मैत्री प्रसिद्धच आहे. या निमित्ताने हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.