www.24taas.com,मुंबई
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नितीन गडकरी यांनी अध्यक्षपद सोडले असून ते निवडणूक लढणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा देत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मी आरोपांने हैराण होऊन राजीनामा देत असल्याचे गडकरींनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. माझ्यामुळे पक्षाला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे. आता क्लीन चिट मिळाल्यावर मी पुन्हा येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पक्षाने ज्या कोणावर जबाबदारी टाकली असेल त्याच्यासह संपूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. गडकरी यांनी स्वतः आरएसएसला सांगितले की, अध्यक्षासाठी माझ्या नावाचा विचार करून नये.
दरम्यान, गडकरींच्या जागेवर राजनाथ सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात बातम्यांवर विश्वास ठेवला तर राजनाथ सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते आहे. गडकरींवर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे संघाने हात झटकले आणि त्याचमुळे त्यांचे अध्यक्ष बनण्याचा रस्त्यात अडथळा निर्माण झाला.
अध्यक्ष म्हणून राजनाथ सिंह दुसऱ्यांदा धुरा सांभाळतील. बुधवारी होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत राजनाथ सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.