दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीभ यापूर्वीही अनेकदा घसरली आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांबाबत त्यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते.
राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या या व्यथा आणि त्यांचे दुःख भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोहचले नसावे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन घेतले आणि आता ही तूर विकण्यासाठी शेतकरी दिवसरात्र खऱेदी केंद्राबाहेर ठाण मांडून आहे. त्यातही त्याला भाव पाडून दिला जातोय. राज्यात यंदा शेतमालाला निच्चांकी भाव मिळतो आहे.
कधी नव्हे ते डाळिंब आणि द्राक्षाचे दरही कोसळले आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांची ही ससेहोलपट दानवेंपर्यंत पोहचली नसावी. त्यामुळेच तूरीचे रडगाणे बंद करा असा सांगतानाच दानवेंची जीभ सैल झाली... 'रडायचे धंदे करू नका... तुरीचं असं झालं... कापसाचं असं झालं... सरकारनं एक लाख टन तुरी खरेदी केली... तरी रडतात साले!' असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांवर उपकार केल्याच्या थाटात केलं. दानवेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियापासून थेट रस्त्यांपर्यंत रान पेटले आहे तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेदेखील दानवेंविरोधात जोडे मारो आंदोलन छेडले... विरोधकांनीही दानवेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
दानवेंच्या वक्तव्यावरून पहिल्यांदाच वाद झालाय असं नव्हे तर यापूर्वीही दानवेंची जीभ घसरलीय. 'गेल्या वर्षी मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे... माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटं चित्र आम्ही उभं करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळाली' असं म्हणत दुष्काळ नसतानाही आम्ही शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळवून दिली, असा दावा बुलडाण्यात करत त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर हे मीठ चोळलं होतं.
दानवे केवळ शेतकऱ्यांचीच थट्टा करतात असं नव्हे तर निवडणुकीच्या काळातही दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच होती. 'मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो... कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा' असं वक्तव्य करत दानवेंनी वाद ओढावून घेतला होता.
रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने केवळ दानवेंच्या अडचणी वाढलेल्या नाहीत तर भाजपाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. आधीच तूर खरेदी, शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे नाराज असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर दानवेंनी मीठ चोळले आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका जसा दानवेंना बसणार आहे. तसा तो त्यांच्या पक्षालाही बसण्याची शक्यता आहे.