मुंबई : अल्पवयीन मुलीने प्रेमप्रकरणामध्ये स्वखुशीने शरीरसंबंध ठेवले असतील तर प्रौढ आरोपीस दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबईतील न्यायालयाने दिला आहे.
अल्पवयीन मुला-मुलींविरोधात घडणा-या लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. एका प्रकरणात अल्पवयीन मुलीचे प्रौढ आरोपीसोबतचे शारीरीक संबंध प्रेम प्रकरणातून होते, त्याला बलात्कार ठरवता येणार नाही असा निकाल देत आरोपीची निर्दोष सुटका केली.
या प्रकरणातील मुलगी ६ ऑक्टोंबर २०१३ रोजी बेपत्ता झाली होती. बाजारात जाते सांगून घराबाहेर पडलेली ही मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीला आरोपी चेतन गायकवाड सोबत शेवटचे पाहण्यात आले होते. दोघांच्या हातात बॅगा होत्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात आधी अपहरणाचा नंतर अल्पवयीनांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) या कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता.
आरोपी गायकवाडसोबत मुलगी परतल्यानंतर पोलिसांनी मुलीची जबानी नोंदवून घेतली, तिची वैद्यकीय तपासणी केली आणि आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. १४ जानेवारीला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एसकेएस रझवी यांनी आरोपी गायकवाडची अपहरण, बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली आणि पोलिसांना आरोपीचा मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिले.
अल्पवयीन मुलीचे गायकवाडसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. त्यामुळेच ती आई-वडिलांना न सांगता घरातून पळून गेली. दोघे पुणे, नाशिक, उदयपूर येथे गेले, तिथे लॉजवर राहिले. परस्पर सहमतीने त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मुलगी स्वेच्छेने आरोपीसोबत गेली, राहिली आणि शरीरसंबंध ठेवले. मुलीला आरोपीसंबंधी कोणतीही तक्रार नाही. ती स्वेच्छेने आरोपीसोबत गेली होती. तिने आरोपीला सहकार्य केले त्यामुळे शिक्षा सुनावण्याचा प्रश्नच येत नाही असा निकाल न्यायालयाने दिला. आरोपीच्या सुटकेसाठी कायदेतज्ञांनी पोलिसांना जबाबदार धरले आहे.