जुहूत तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार...

मुंबईतल्या जुहूमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. शाळेतून घरी ने-आण करणाऱ्या स्कूलबसमधल्या क्लिनरनंच हे घृणास्पद कृत्यं केल्याचं समोर येतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 19, 2013, 11:47 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या जुहूमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. शाळेतून घरी ने-आण करणाऱ्या स्कूलबसमधल्या क्लिनरनंच हे घृणास्पद कृत्यं केल्याचं समोर येतंय.
जुहू भागातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या अजून धड बोलताही येत नसणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलीय. या प्रकरणात संबंधित स्कूलबस क्लिनरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. कोर्टासमोर हजर केल्यानंतर या क्लिनरला एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बसमध्ये हे कृत्यं घडत असताना बस ड्रायव्हरचाही सहभाग होता का? ही घटना घडत असताना त्याला याची भनक का लागली नाही? यासंबंधी पोलीसांची चौकशी सुरू आहे.

दिल्लीमध्ये बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणाला नुकतंच एक महिना पूर्ण होतोय. त्याचवेळी मुंबईतील ही घटना उघड झाल्यानं एकच खळबळ उडालीय. या प्रकरणानंतर शाळेत जाणाऱ्या मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय. कायद्याचा धाक आता उरला नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.