मुंबई : आता एक बातमी तुम्हाला थक्क करणारी. मायानगरी मुंबईत भीक मागण्याच्या गोरखधंद्यातून करोडो रूपयांची उलाढाल होते. मुंबईत जवळपास १ लाखाहून अधिक भिकारी आहेत. आणि त्यांची वर्षाकाठीची कमाई भल्याभल्यांना चक्रावणारी आहे. कशी असते ही भिकाऱ्यांची मालामाल दुनिया..? एक खास रिपोर्ट.
दयेची करूणा भाकत, भीक मागणारा हा छोटा मुलगा असो, नाहीतर आपल्या अपंगत्वाचा हवाला देऊन मदतीची याचना करणारा भिकारी असो. त्यांची दयनीय अवस्था, गरिबी आणि फाटके कपडे पाहून आपला हात नकळत खिशात जातो. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की, मुंबईत भीक मागणं हा संघटित बिझनेस आहे. याची वार्षिक उलाढाल करोडो रूपयांच्या घरात आहे. पर्यटन स्थळांपासून, धार्मिक स्थळांपर्यंत आणि रेल्वे स्टेशनपासून लोकल ट्रेनपर्यंत त्यांची फिरती असते. कोण कुठे भीक मागतो, यावर कमाईचं गणित अवलंबून असतं.
कमाईचे सर्वात मोठे अड्डे आहेत ती पर्यटनस्थळे. कुलाबा, गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, जुहू चौपाटी असे टुरिस्ट स्पॉट्स. त्याशिवाय सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी, हाजीअली, माहीम दर्गा ही धार्मिक स्थळं म्हणजे भिका-याचे हॉटस्पॉट्स. हे भिकारी दररोज सुमारे ४०० ते ५०० रूपयांची कमाई करतात.
एखाद्या महिलेच्या झोळीत लहानगं बाळ असेल तर तिची कमाई ५०० ते ६०० रूपयांपर्यंतही होते. त्यात २०० रूपये लहानग्या बाळाचं भाडं द्यावं लागतं. चर्चगेट, अंधेरी, दादर, बांद्रा, सीएसटी, ठाणे, घाटकोपर अशा रेल्वे स्टेशन्समध्ये सरासरी २०० ते ३०० रूपयांची कमाई होते. तर मुंब्रा, गोवंडी, जोगेश्वरी, कुर्ला या भागात जेमतेम २०० ते ३००रूपये एवढीच भीक मिळते.
भीक मागण्याचा हा धंदा संघटित स्वरूपाचा आहे आणि त्याचा पर्दाफाश करणं खूपच मुश्कील असतं. नाही म्हणायला पोलीस कधी कधी भिका-यांना पकडण्याची कारवाई करतात. पण ती नावालाच. गेल्या वर्षभरात भिकाऱ्यांकडून केवळ ७० लाख रूपयांची दंडआकारणी करण्यात आली.
एका अंदाजानुसार, मुंबईत जवळपास १ लाखाहून अधिक भिकारी आहेत. त्यांची वार्षिक कमाई आहे सुमारे ७० कोटी रूपयांची. या भिकाऱ्यांमध्ये ७० टक्के भिकारी हे अपंग, लहान मुले किंवा तृतीयपंथी असतात. बाकी ३० टक्के सर्वसाधारण भिकारी असतात.
सुमारे ८० टक्के भिकारी एखाद्या सिंडिकेटसाठी म्हणजे भिका-यांच्या टोळीसाठी काम करतात. तर उर्वरित २० टक्के भिकारी वैयक्तिकरित्या भीक मागतात. भिकाऱ्यांच्या टोळीत प्रत्येक दहा भिकाऱ्यांमागे एक ज्युनिअर सुपरवायझर असतो. अशा पाच ज्युनिअर सुपरवायझरवर एका सिनिअर सुपरवायझरची नजर असते. हा सुपरवायझर टोळीच्या बॉसच्या हाताखाली काम करतो.
भिकाऱ्याच्या कमाईतला ३० टक्के हिस्सा टोळीकडे जातो. त्याबदल्यात ही टोळी भिकाऱ्यांना सुरक्षा, आश्रय देते. त्यांची भीक मागण्याची जागा निश्चित करून देते.सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीक मागण्याचा धंदा कायम भरभराटीतच असतो. मंदी असो, नाहीतर चांदी, भिकाऱ्यांच्या थालीत नाण्यांची छनछन कायमच असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.