मुंबई : एक हृदयस्पर्शी बातमी... अशी बातमी जी भारत-पाकिस्तानचे संबंधांना जोडू शकेल... पाकिस्तानात राहणारी सबा मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आलीय. सबा, विल्सन नावाच्या दूर्धर आजारानं ग्रस्त आहे. आम्हाला आशा आहे की एक ना एक दिवस सबा नक्कीच ठीक होईल...
जेव्हा दु:ख हसत असेल त्यावेळी ते नक्कीच सबासारखं दिसत असेल... पाकिस्तानातून आलेल्या १६ वर्षांच्या सबावर मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आयुष्य कितपत साथ देईल तिला माहीत नाही. अशातही जगण्याची उमेद मात्र कायम आहे.
सबा तारिक अहमदला 'विल्सन' नावाचा दुर्धर आजार झालाय. एक लाख लोकांमधून केवळ चार जणांना होणारा हा रोग एवढा भयंकर आहे की ज्यामुळे मनुष्य झुरुन झुरुन मरतो... या रोगामुळे शरीरातल्या महत्त्वाच्या भागात कॉपर जमा होऊ लागतं आणि त्यानंतर शरिरात इतर भागात त्याचं इंफेक्शन पसरतं.
सुरुवातीला सबाच्या आजारपणाबाबत काहीच समजलं नाही. कराचीतल्या डॉक्टरांनी तिच्यावर चुकीचे उपचार केले. त्यामुळे सबाची तब्येत आणखीनच खालावली. रोगाचं निदान झाल्यानंतर सबाच्या आईला - नादियाला आशेचा किरण दिसला तो भारतातच...
केवळ उपचारच नव्हे तर आर्थिक संकटही आ वासून सबाच्या आईसमोर उभं होतं. नादियानं कसेबसे ८० हजार रुपये जमा केले. मात्र उपचाराचा खर्च पाच लाखांपर्यंत जात होता. सबाचा त्रास पाहून सामाजिक कार्यकर्ते साबिल वली यांनी मदतीचा हात दिला.
आता सबाची प्रकृती सुधारु लागलीय. निदान तिच्यावर आता योग्य उपचार तरी होऊ लागलेत. मात्र पूर्ण बरं होण्यासाठी तिला आणखी वेळ लागणारे आहे. जसलोक हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते सबाच्या यकृत आणि मेंदूलाही इंफेक्शन झालंय. तिला कमीत कमी दोन महिने भारतात रहावं लागणार आहे.
दररोज सीमेवर एकमेकांसमोर बंदूक रोखणाऱ्या भारत-पाकिस्तानसाठी सबा एक दुवा आहे... भारतानं ज्या पद्धतीनं पाकिस्तानातून आलेल्या सबाला आपल्या हृदयाशी धरलं त्यावरून समजतं की माणुसकीपेक्षा दुसरा कुठलाही राष्ट्रधर्म नसतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.