`राज-उद्धव एकत्र आणण्यासाठी गडकरींनी प्रयत्न करावे`

‘गडकरी हे शिवसेनेचे मित्र आणि हितचिंतक आहेत. त्यांना जर खरोखर आत्मविश्वास असेल तर त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत’

Updated: May 14, 2013, 04:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुबंई
‘गडकरी हे शिवसेनेचे मित्र आणि हितचिंतक आहेत. त्यांना जर खरोखर आत्मविश्वास असेल तर त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत’ असं खासदार संजय राऊत म्हणाले. ‘उद्धव ठाकरेंचे मन साफ आहे, आणि त्यामुळेच त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला होता. यामुळे दोघं एकत्र येण्यासाठी गडकरींनी प्रयत्न करावेत. असेही संजय राऊत यांनी ‘झी २४ तास’शी बोलताना स्पष्ट केले.
भाजप माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ‘झी २४ तास’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले होते. त्यावरच बोलताना संजय राऊत यांनी आज त्यावर उत्तर दिलं. नितीन गडकरी यांनी राज-उध्दव यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. बाळासाहेबांचीही तशी अतीव इच्छा होती. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी या दोघांनी एकत्र यावं असं ते म्हणाले होते.
दिल्लीच्या राजकारणात आपलं मन रमत नाही, अशी मनापासून कबुलीही त्यांनी दिली. गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये एक टक्का जरी दोषी आढळलो तरी राजकारण सोडेन, या शब्दात भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी विरोधकांना आव्हान दिलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.