मुंबई : शिक्षक संघटनांनी आज शाळा बंद आंदोलन पुकारलं आहे. शासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही मागण्या मान्य होत नसल्याने हे आंदोलन करण्यात येतंय. विशेष म्हणजे राज्यातल्या १८ संघटना पहिल्यांदाच या मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत.
मात्र, विविध शाळांमध्ये दहावी-बारावी परीक्षेपूर्वी घेण्यात येणारी प्राथमिक परीक्षा सुरू असल्याने मुंबईतील शाळा या संपात सहभागी होणार नाहीत.
राज्यात विनाअनुदान धोरण तातडीने रद्द करा, चिपळूणकर समितीच्या शिफारशींप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं मंजूर करावीत, शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याची प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करावी, अशा प्रलंबित मागण्यांसाठी या संघटनांनी सरकारविरोधात एकत्रितपणे दंड थोपटले आहेत.
शाळा बंद आंदोलनात राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. मुंबईसह राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर शिक्षक संघटनांकडून धरणं आंदोलन करण्यात येणार आहेत.
दरम्यान, शिक्षकांच्या शक्य त्या मागण्या पूर्ण करू, मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान करु नये, असं आवाहन शिक्षकमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांना केलं आहे. मात्र आर्थिक बाबींवर लगेच निर्णय घेता येणार नसल्याचंही तावडे यांनी स्पष्ट केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.