मुंबई : रेल्वे डब्यांत ज्येष्ठ नागरिकांना सहज जागा उपलब्ध होईल यासाठी पावलं उचला अशी ताकीदच, मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना लोकलमध्ये बसण्याकरता सहज आसनं उपलब्ध होतील, असा नियमच केल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं. मात्र रेल्वे प्रशासन आपल्याच नियमाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असे खडे बोलही न्यायालयाने यावेळी रेल्वे प्रशासनाला सुनावले.
ज्येष्ठांची आसनं वृद्धांनाच कशी उपलब्ध होतील, हा पूर्णपणे रेल्वे प्रशासनाचा प्रश्न असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. त्याचवेळी महिलांचे आरक्षित डबे तसंच अपंगाकरताच्या आरक्षित डब्यांमधल्या आसनांना हात लावू नये, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
सोबतच येत्या १५ एप्रिलपर्यंत याबाबात ठोस निर्णय घ्या आणि प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. या प्रकरणाची पुढली सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.