मुंबई : शेअर बाजारांची घोडदौड कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आज नव्या उंचीवर पोहोचले. दिवसअखेर सेन्सेक्स 29 हजार 974 अंशांवर तर निफ्टी 9 हजार 265 अंशांवर बंद झाले.
दोन दिवसांपूर्वीच केलेला विक्रम शेअर बाजारानं आज लगेच मोडीत काढलाय. रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांमध्ये सर्वाधिक तेजी राहिली. दिवसभरात सेन्सेक्सनं 30 हजारांचा जादुई टप्पाही गाठला होता.
इंट्रा डे व्यवहारांमध्ये सेन्सेक्स 30 हजार 7 अंशांवर जाऊन आला. दरम्यान, उद्या रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर होणार आहे. व्याजदरांमध्ये कोणतेही बदल अपेक्षित नसले, तरी NPA आणि अतिरिक्त असलेली लिक्विडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी बाजाराला अपेक्षा आहे. तसं झाल्यास उद्या शेअऱ बाजार 30 हजारांचा जादुई आकडा प्रथमच पार करेल, अशी शक्यता आहे.