शिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकीकडे विरोधकांच्या एकीचा सामना सरकार करत असताना आता सरकारला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांचाही सामना करावा लागणार आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत बहुतांश आमदारांचा सूर सरकारच्या विरोधात होता. संपूर्ण कर्जमाफीच्या विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देण्याबरोबरच भाजपाच्या मंत्र्यांचे घोटाळे अधिवेशनात बाहेर काढण्याची भूमिका घेऊन शिवसेना आमदारांनी दंड थोपटले आहेत.

Updated: Jul 14, 2015, 04:42 PM IST
शिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकीकडे विरोधकांच्या एकीचा सामना सरकार करत असताना आता सरकारला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांचाही सामना करावा लागणार आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत बहुतांश आमदारांचा सूर सरकारच्या विरोधात होता. संपूर्ण कर्जमाफीच्या विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देण्याबरोबरच भाजपाच्या मंत्र्यांचे घोटाळे अधिवेशनात बाहेर काढण्याची भूमिका घेऊन शिवसेना आमदारांनी दंड थोपटले आहेत.

विरोधकांच्या घोषणाबाजीत आता सरकारला सामना करावा लागणार आहे तो सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या आमदारांचाच.. कारण आता शिवसेना आमदारांनी सरकारविरोधात दंड थोपटण्याचे ठरवले आहे. शिवसेना आमदारांची झालेली बैठक वादळी ठरली. सत्तेत सहभागी असूनही शिवसेना अस्वस्थ आहे. त्याचेच पडसाद शिवसेना आमदारांच्या बैठकीत उमटले आहेत. बहुतांश शिवसेना आमदारांनी भाजपाविरोधातील आपला राग बैठकीत व्यक्त केला.

शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय 
- अधिवेशात आता शिवसेनेचे आमदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करणार
- भाजपाच्या मंत्र्यांचे घोटाळे अधिवेशनात मांडणार
- अनेक शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात आमदारांना त्रास देण्यासाठी विशिष्ट - अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याची शिवसेना आमदारांची तक्रार
- शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अद्याप अधिकार दिला नसल्याने राज्यमंत्री नाराज
- मुंबईतील आमदारांची कामे अडवली जात असल्याची मुंबईतील आमदारांची तक्रार

अशाप्रकारे आपली नाराजी शिवसेना आमदारांनी बैठकीत मांडली. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेतेही सरकारविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

शिवसेनेच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीबाबत भाजपाचे नेते कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, तसेच सामनामधून होणाऱ्या टीकेवरही थेट बोलण्याचं टाळलं जातंय.

मागील दोन दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला अडचणीत आणलं आहे. मात्र सरकारने विरोधकांच्या या आक्रमकपणाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. आता सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेच ही भूमिका मांडल्याने भाजपाची आणि मुख्यमंत्र्यांची कोंडी होणार आहे.

सत्तेत सहभागी असूनही शिवसेना सरकारविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. आतापर्यंत सामनाच्या माध्यमातून भाजपावर टीका करणाऱ्या शिवसेनेचे आमदार आता अधिवेशनातही सरकारविरोधात भूमिका घेताना दिसणार आहेत. त्यामुळे अधिवेशनात भाजपा एकाकी पडणार हे निश्चित आहे. एकाकी असलेल्या भाजपाला आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचा मुकाबला करावा लागणआर आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.