सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट

गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख तसंच प्रजापती यांच्या एन्काउंटर प्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चीट दिल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टानं शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट दिली. 

Updated: Dec 30, 2014, 02:18 PM IST
सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट title=

मुंबई: गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख तसंच प्रजापती यांच्या एन्काउंटर प्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चीट दिल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टानं शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट दिली. 

गुजरात इथं २००५ मध्ये हा एन्काउंटर झाला, त्यानंतर या एन्काउंटरचा प्रमुख साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचाही एन्काउंटर झाला़. त्यात अमित शहा आणि गुजरात पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा ठपका ठेवत सीबीआयनं याचे आरोपपत्रही दाखल केले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला सुनावणीसाठी मुंबईत वर्ग करण्यात आला होता. विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरू असताना या प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा अर्ज शहा यांनी केला होता.  गुजरातचा गृहमंत्री असताना नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी माझी होती. त्या हेतूनं मी सतत पोलिसांच्या संपर्कात असायचो. मात्र या एन्काउंटरशी माझा काहीही संबंध नाही, राजकीय वैमनस्यातून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तेव्हा या प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी विनंती शहा यांनी अर्जात केली होती. 

मात्र सोहराबुद्दीन याचा भाऊ रूबाबुद्दीन यानं अर्ज करून शहा यांच्या विनंतीला विरोध केला होता. अखेर आज न्यायालयानं शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट देत असल्याचा निर्णय जाहीर केला. 

दरम्यान केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळं शहा यांना क्लीन चीट मिळाली असून न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील करू, असं सोहराबुद्दीन यांचा भाऊ रुबाबुद्दीन यांनी म्हटलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.