मुंबई :विधान परिषद सभापतीपदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीत चार उमेदवारांनी अर्ज भरल्यानं, आता ही निवडणूक रंगतदार झाली आहे. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती उघड करण्यासाठीच, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन या निवडणुकीत एक नवी चाल खेळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे विधानसभेच्या दोन मतदारसंघात होणा-या पोटनिवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. कवठे महांकाळमध्ये बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेच्या तृप्ती सावंतांच्या विरोधात काँग्रेसचे नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळं कवठे महांकाळ मतदारसंघात, तर शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळं वांद्रे पूर्व मतदारसंघात येत्या 11 एप्रिलला पोटनिवडणूक होणाराय... राष्ट्रवादी काँग्रेसनं आर.आर. आबांच्या जागी त्यांच्या पत्नी सुमनताई यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर शिवसेनेनं बाळा सावंतांच्या जागी त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना तिकीट दिलीय. एकीकडं सुमनताईंची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर तृप्ती सावंत यांच्या विरोधातही कुणी उमेदवार उभा करू नये, असं आवाहन शिवसेनेनं केलंय.
मनसेपाठोपाठ आता भाजपनंही या दोन्ही जागांवर उमेदवार उभा करणार नसल्याची घोषणा केलीय. गेल्या विधानसभा निवडणुकीतून पराभूत झालेले नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. राणे उभे राहिल्यास वांद्र्याच्या बालेकिल्ल्यात राणे विरूद्ध शिवसेना असा सामना पुन्हा एकदा रंगेल. मात्र राणे खरोखरच निवडणूक लढवणार आहेत का? की निव्वळ खडा टाकून अंदाज घेण्याचा प्रयत्न राणेंनी केलाय? राणे उभे राहिल्यास काँग्रेसमधूनच त्यांना विरोध होईल का? आणि सिंधुदुर्गात आपटी खाणा-या राणेंना काँग्रेस पक्ष मुंबईतून उमेदवारी देईल का? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.