मुंबई : राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेच्या वानवा यामुळे संताप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत.
सरकारने सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचं आश्वासन दिलंय. पण असली आश्वासनं आता कामाची नाहीत. प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोवर कामावर येणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांच्या संघटनेनं घेतलीय. डॉक्टरांना काम करताना सुरक्षित वाटेल यासाठी सरकारनं पावलं उचलावीत असंही संघटनेचं म्हणणं आहे.
दरम्यान, बहुतांश ठिकाणी निवासी डॉक्टरांचं काम बंद असलं तरी कायम नोकरीत असणारे प्राध्यपक आणि डॉक्टर रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याचा दावा निवासी डॉक्टरांनी केलाय.
तिकडे हायकोर्टात या कामबंद आंदोलनविरोधात याचिकेवर सुनावणी होणार आहे. निवासी डॉक्टरांचा संप बेकायदेशीर असून सामूहिक रजेवर जाऊन डॉक्टरांकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलाय.
वारंवार संपावर जाऊन रूग्णांना वेठीला धरणं हे योग्य नसून त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. गेल्यावर्षी मार्डच्या संपाविरोधात याचिका झाली होती. त्यावर निकाल देताना पुन्हा कधी संप करणार नाही असं मार्डकडून लिहून घेण्यात आलं होतं.