www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम मतांवर डोळा ठेवून सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका शिवसेना, मनसेने केलीय. तर या निर्णयाबाबत आपणाला काहीच माहिती नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत.
विकासाच्या प्रक्रियेत मुस्लिम समाजाला सामावून घेण्यासाठी सच्चर कमिटीच्या शिफारसीनुसार विविध योजना राबवण्यात येत आहेत. अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री नसीम खान यांनी आता मदरशांना सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदरशांना 9 कोटी 90 लाख रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. 3 वर्षे पूर्ण झालेल्या सुमारे 200 मदरशांना त्याचा लाभ मिळणार आहे. शिक्षकांचे पगार, विद्यार्थी शिष्यवृत्ती, मदरशांचे बांधकाम यासाठी हे अनुदान असेल. अनुदानित मदरशांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचे क्रमिक शिक्षण दिले जाणार असून, या विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षेला बसणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
मदरशांना अनुदान देण्याच्या निर्णयावरून आता राजकीय वादाला तोंड फुटलेय. निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम मतांवर डोळा ठेवून सरकार निर्णय घेत असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय. मतांच्या बेगमीसाठी मुस्लिमांना मदत देणं चुकीचं असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये. आता धर्मांध कोण आहे, असा सवाल त्यांनी केलाय...
मदरशांना अनुदान देण्य़ाच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टीका केली. निवडणुका जवळ आल्या की असे निर्णय घेतले जातात, अशी टीका त्यांनी केली. ही काँग्रेसची एक खेळी आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधाला.
आश्चर्याची बाब म्हणजे राज्य मंत्रिमंडळात एवढा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दुपारपर्यंत त्याबाबतची माहितीच नव्हती. असा काही प्रस्तावच मंत्रिमंडळापुढे नसल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर काही मिनिटांतच मंत्रिमंडळ बैठकीत मदरशांना अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आता खरोखरच शरद पवारांना अंधारात ठेवून सरकारने हा निर्णय घेतलाय की शरद पवार जाणीवपूर्वक या निर्णयातून अंग काढून घेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.