मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार सर्वात पुढे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2014, 11:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याची शक्यता आहे.
‘झी २४ तास’ने सर्वप्रथम बुधवारी मुख्यमंत्री बदलाची बातमी ब्रेक केली होती... महाराष्ट्रासह आसाम आणि हरियाणाचे मुख्यमंत्रीही बदलण्याचा काँग्रेस हायकमांडचा विचार असल्याचं समजतंय. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह आणखी ८-१० राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नेतृत्व बदल होत असल्याच्या ‘झी २४ तास’च्या बातमीने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर होत असलेला हा बदल खरचं पक्षाला तारेल का? यातून काय साध्य होईल असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. तर पराभूत नेत्याकडे राज्याचे नेतृत्व देऊन काय फायदा होणार असाही एक मतप्रवाह आहे..
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत नारायण राणे, राधाकृष्ण विखेपाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांचीही नावं चर्चेत आहेत.
नारायण राणे यांचं नाव चर्चेत असून त्यांचा आक्रमक पणा काँग्रेसला तारे असं काही आमदारांना वाटत असलं तरी त्यांना विरोध करणारा मतप्रवाहही काँग्रेसमध्ये आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे दिल्लीत तळ ठोकून आहेत. पण त्यांच्या नावावर वरिष्ठ नेत्यांची सहमती होण्याची शक्यता कमी दिसते. याशिवाय बाळासाहेब विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराविरोधात प्रचार केला होता अशा तक्रारी दिल्लीपर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा स्वच्छ, कारभार उत्तम, पण निवडणूक जिंकण्याची क्षमता त्यासाठीचा आक्रमकपणा याबद्दल काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.
हर्षवर्धन पाटील यांचे गटातटांशी सलोख्याचे संबंध असले तरी निवडणूक एकहाती जिंकण्याची क्षमता यावर प्रश्नचिन्ह आहेच. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये निवडणूक स्वतंत्रपणे लढावी अशी मागणी आता जोर धरत आहे. एनसीपीशी जर फारकत घेतली. तर एकहाती निव़डणूक जिंकण्याची क्षमता हा निकश महत्त्वाचा असेल अन्यथा एनसीपीशी जूळवून घेणार नेता हाही निकश असू शकतो.
या सगळ्या बातम्या ‘झी २४ तास’वर सर्वप्रथम देण्यात आल्या होत्या. आणि आत्ता आणि यापुढेही यातील विश्वासपूर्ण नि:पक्षपाती बातम्या आम्ही आपल्यापर्यंत देत राहू. या सगळ्या घडामोडींवर २४ तास अत्यंत बारीक नजर ठेऊन आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.