www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून ठाणे ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच एका न्यायाधिशाची बदली करण्यात आलीय. गैरजबाबदार वर्तवणुकीचा ठपका ठेऊन सरकारनं ठाण्याचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक रविंद्र सेनगांवकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना निलंबित केलंय. तर मुंबई हायकोर्टानं, प्रकरणाची योग्य दखल न घेतल्याचा ठपका ठेवत फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट रामचंद्र बागडे यांची बदली करण्याचे आदेश दिलेत.
१८ नोव्हेंबर रोजी २१ वर्षीय शाहीन डाढा हिनं बाळासाहेब ठाकरेंचं नाव न घेता फेसबूकवर बंदवरून कमेंट पोस्ट केली होती. याच पोस्टला शाहीनची मैत्रिण रेणूनं ‘लाईक’ केलं होतं. शाहीननं केलेल्या पोस्टवर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दोन्ही मुलींविरुद्ध लोकांच्या भावना भडकावल्याची तक्रार दाखल केली होती. तसंच शाहीनच्या काकांच्या हॉस्पीटलमध्ये घुसून काही लोकांनी तोडफोडही केली होती. त्यानंतर या दोन्ही मुलींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर देशभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही घटनेची दखल घेत योग्य कारवाईचे आदेश दिले होते. आयजी रँक असलेल्या एका अधिकाऱ्याला सदर घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलं होतं.
या अधिकाऱ्याच्या अहवालानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सदर घटनेला योग्य पद्धतीनं हाताळलं नाही. दोन्ही मुलींवर एवढ्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यामागची कारणं अनुचित होती, असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. दोन्ही मुलींवर भावनांना भडकावण्याचे तसेच चुकीचा संदेश देण्याचे आरोप लावण्यात आले होते. तसंच मॅजिस्ट्रेटनं शाहीन आणि रेणू यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. तर हॉस्पीटलमध्ये तोडफोड करणाऱ्यांना ७५०० रुपयांवर जामीन मिळाला होता.
दरम्यान, फेसबुकप्रकरणी राज्य सरकारनं ठाणे पोलिसांविरोधात सुरु केलेल्या कारवाईवर शिवसेनेनं टीका केलीये. सरकारच्या कारवाईमुळं पोलिसांचं खच्चीकरण होत असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलीये. आर आर पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या पाठित खंजीर खुपसल्याची टीका केलीय.