सोन्याची चेन मिळवण्यासाठी चोराला खाऊ घातली चार डझन केळी

मुंबईमध्ये एका चोराकडून चेन मिळवण्यासाठी पोलिसांना चोराला चार डझन केळी खाऊ घालाव्या लागल्या. बुधवारी रात्री घाटकोपर पूर्व येथे ही घटना घडली. 

Updated: Jan 10, 2016, 11:57 AM IST
सोन्याची चेन मिळवण्यासाठी चोराला खाऊ घातली चार डझन केळी title=

मुंबई : मुंबईमध्ये एका चोराकडून चेन मिळवण्यासाठी पोलिसांना चोराला चार डझन केळी खाऊ घालाव्या लागल्या. बुधवारी रात्री घाटकोपर पूर्व येथे ही घटना घडली. 

एका साखळी चोराने एका महिलेची २५ ग्रॅमची सोन्याची चेन घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने जोरदार आरडाओरड करताच स्थानिकांना त्या चोराला पकडण्यात यश आले. यावेळी त्यांनी चोराला बेदम मारहाणही केली. मात्र त्या दरम्यान चोराने ती चेन गिळून टाकली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात नेले. त्याच्या एक्सरे रिपोर्टमध्ये धातूसदृश्य वस्तू दिसली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा एक्सरे काढला. यात चेन असल्याचे दिसले. चेन मिळवण्यासाठी गुरुवारी रात्री पोलिसांनी त्या आरोपीला चार डझन केळी खाऊ घातली. त्यानंतर ही चेन त्याच्या पोटातून बाहेर निघाली.