मरिन ड्राईव्हवर अपघात; बड्या बिल्डरचा बेटा अडकला

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री साडेतीनच्या सुमारास एका २४ वर्षीय मुलाला भरधाव वेगानं जाणाऱ्या एका गाडीनं उडवल्यानं त्याचा मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 21, 2014, 11:07 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री साडेतीनच्या सुमारास एका २४ वर्षीय मुलाला भरधाव वेगानं जाणाऱ्या एका गाडीनं उडवल्यानं त्याचा मृत्यू झालाय. मुलाचं नावं मयूर कदम (फोटोत उजवीकडे) आहे. हॉटेल ट्रायडंट समोरच्या रोडवर हा अपघात झाला. तपासानंतर पोलिसांनी मुंबईतील एका बड्या बिल्डरच्या मुलावर एफआयआर दाखल केलाय.
मरिन ड्राईव्हवर गुरुवारी रात्री 11.15 च्या दरम्यान हा अपघात झाला. या प्रकरणात पोलिसांनी मुंबईतील चंपालाल वर्धन या एका बड्या बिल्डरच्या मुलाला म्हणजेच कुणाल वर्धन (फोटोत डावीकडे) याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलीय. मात्र, अद्यापही पोलिसांनी कुणालला अटक केलेली नाही. शुक्रवारी रात्री म्हणजेच अपघातानंतर तब्बल 24 तासांनी ही पोलिसांनी कुणालला ताब्यात घेतलं.
भायखळ्याला राहणारा मयुर हा लालबागला आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. तिथून तो रात्री 9 च्या सुमारास बाईकवर निघाला. मात्र, त्याच्या भावाला – मंदार कदम याला रात्री 11.30 वाजता फोन आला तो मयुरचा अपघात झाल्याचा... त्याला बॉम्बे हॉस्पीटलला हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
अपघातानंतर कुणालनं मयुरला टॅक्सीत घालून बॉम्बे हॉस्पीटलला हलवलं... पण, यासंबंधी त्यानं पोलिसांना मात्र काहीही कळवलं नव्हतं.
एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, MH-46 AD 46464 या गाडीनं मरिन ड्राईव्ह रोडवर एअर इंडियाच्या बिल्डींगसमोर मयुर कदम या तरुणाला उडवलं.
मयुर हा ‘तृप्ती भोईर प्रोडक्शन’ या सिनेनिर्माता कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहत होता. त्यानं ‘टुरिंग टॉकिज’ या मराठी सिनेमाचंही काम पाहिलं होतं. तर कुणाल वर्धन हा त्याच्या गाडीप्रेमासाठी ओळखला जातो. त्याच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्श अशा गाड्यांचा ताफा आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व गाड्यांचा शेवटचा नंबर ....4646 असाच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.