मुंबई : घाटकोपर येथील दोन मुले पाच दिवसांपासून बेपत्ता होती. ही दोन्ही मुले चेन्नईत सापडल्याने दोन्ही कुटुंबांचा जीव भांड्यात पडलाय.
आपली मुले गायब असल्याने दोन कुटुंबे टेन्शनमध्ये होतीत. पाच दिवस शोध घेऊनही मुले सापडली नसल्याने त्यांच्या जीवाला घोर लागला होता. दोघे कुठे गेले असतील, इतक्या दिवसांत काय खाल्ले असेल, सुरक्षित तरी असतील का, असा घोर आई-वडिलांना पडला होता.
घाटकोपरच्या पूर्वेकडील गारोडिया नगरमध्ये राहणारे सतीश तेवर (१४) आणि मारिया तेवर (१३) हे मित्र. २६ डिसेंबरला क्लासवरून घरी आल्यावर मारिया खेळायला गेला म्हणून आजी त्याला ओरडली. यामुळे रागावलेला मारिया घरातून बाहेर पडला. रात्री १० वाजले तरी मारिया घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्यावेळी जवळच राहणारा त्याचा मित्र सतीशदेखील गायब होता.
सतीशचा मोबाईलही बंद होता. त्याची सायकलदेखील नेहमीच्या जागी नव्हती. रात्री १२ वाजले तरी दोघे घरी न परतल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर धनावडे यांनी सतीश आणि मारिया यांना शोधण्यासाठी पथके तयार केली.
घाटकोपर ते चेन्नई व्हाया कुर्ला घरातून निघाल्यावर मारिया हा सतीशकडे गेला. दोघेही सायकलवरून जवळच्याच कामराजनगरमध्ये गेले. या ठिकाणी भाड्याने खोली शोधू लागले. त्यांना कोणी खोली दिली नाही. दरम्यान, आपल्या मागावर पोलीस असल्याची कुणकुण लागताच दोघांनी सायकलवरून कुर्ला टर्मिनस गाठले.
पोलिसांनी शोध घेतल्यानंतर कुर्ला टर्मिनसबाहेर त्यांची सायकल सापडली. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी चेन्नईकडे जाणारी गाडी पकडल्याचे दिसले. पोलिसांनी तत्काळ तेवर कुटुंबीयाचे चेन्नईतील नातेवाईक, आरपीएफ तसेच स्टेशनमास्तरला कळवून स्थानकावरच दोघांना ताब्यात घेतले.