मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन पंधरा वर्षांपूर्वीच भारताच्या तावडीत सापडला असता, असा गौप्यस्फोट मुंबई पोलीस दलातील माजी एसीपी शंकर कांबळे यांनी केलाय. सरकारी प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं राजनला आणता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बँकॉकमध्ये २००० साली छोटा राजनवर छोटा शकीलकडून हल्ला झाला होता. त्यानंतर राजनला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. या घटनेनंतर तत्कालीन एसीपी शंकर कांबळे यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे ३ सदस्यीय पथक थायलंडला राजनच्या चौकशीसाठी पोहोचले होते.
मुंबई पोलीस राजनच्या इतक्या जवळ होते की १५ दिवस दररोज २ ते ३ तास राजनची चौकशी होत असे. त्यावेळी भारतात परतण्याबाबत राजन सुरुवातीला द्विधा मनस्थितीत होता. मात्र, नंतर त्यानं याबाबत नकार दिल्याचं कांबळेंनी म्हटलं.
अखेरीस राजनला भारतात आणण्याची सरकारी प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं मुंबई पोलिसांना १५ दिवसांनी रिकाम्या हातानं परतावं लागल्याचा गौप्यस्फोट कांबळे यांनी केलाय. त्यामुळं राजनला भारतात आणण्याबाबत तत्कालीन सरकारची इच्छाशक्ती कमी पडली का की राजनला भारतात आणू नये, असं कोणाला वाटत होते का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.