फेरीवाला मृत्यूप्रकरण : वसंत ढोबळे यांना क्लीन चिट

मुंबईचा दबंग अशी ओळख असलेल्या पण तितक्याच वादग्रस्त ठरलेले पोलीस अधिकारी वसंत ढोबळेंना एका प्रकरणात दिसाला मिळालाय. वाकोला पोलिसांनी ढोबळेंना क्लीन चीट दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 7, 2013, 09:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईचा दबंग अशी ओळख असलेल्या पण तितक्याच वादग्रस्त ठरलेले पोलीस अधिकारी वसंत ढोबळेंना एका प्रकरणात दिसाला मिळालाय. वाकोला पोलिसांनी ढोबळेंना क्लीन चीट दिलीय.
मदन जयस्वाल या फेरीवाल्याच्या मृत्यूला वसंत ढोबळे कारणीभूत आहेत असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता मात्र चौकशी अंती ढोबळेंचा जयस्वाल यांच्या मृत्यूशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालाय. वाकोल्यात फेरीवाल्यांवर कारवाई करताना जयस्वाल या फेरीवाल्याचा मृत्यू झाला होता मात्र हा मृत्यू नैसर्गिक असून मृत्यूवेळी वसंत ढोबळे आपल्या गाडीत होते त्यामुळे ढोबळेंना या प्रकरणात क्लीन चीट मिळालीय.
जानेवारी महिन्यात मुंबईतील सांताक्रुझमध्ये वसंत ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा फेरीवाला हटाव मोहीम सुरू होती. यावेळी मदन जयस्वाल या फेरीवाल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र जयस्वाल याचा मृत्यू ढोबळे यांच्याशी झालेल्या झटापटीमुळे आणि ढोबळे यांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा आरोप जयस्वाल कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर ढोबळे यांची सशस्त्र दलात बदली करून याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात आली होती.
सीआयडीच्या चौकशीमध्ये बेकायदा फेरीवाला हटाव मोहीम सुरू असताना वसंत ढोबळे हे जीपमध्येच बसून होते. त्यांनी कोणत्याही प्रकारची मारहाण केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फेरीवाला मृत्यू प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यामुळे ढोबळे यांची नव्याने कुठे नियुक्ती होते की त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ