नाराज जोशी सर कुठे गेले?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठं गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 14, 2013, 07:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठं गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही.
आज सकाळी ते दादरच्या ओशियाना निवासस्थानातून पत्नीसह बाहेर निघाले. आपल्या गावी नांदवीला ते जात असल्याची माहिती जोशींच्या निकटवर्तियांनी दिली. परंतु ते गावी गेलेले नसल्यानं ते नेमके कुठं आहेत, याचा पत्ता कार्यकर्त्यांनाही नव्हता. त्यामुळं गेले मनोहर जोशी कुणीकडं, अशी चर्चा रंगली होती.
मनोहर जोशी शिवसेना सोडणार का? शिवसेना सोडली तर ते कोणत्या पक्षात जातील आणि त्यांची पुढची राजकीय कारकीर्द कशी असेल, याबाबत नानाविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर केलेली टीका मनोहर जोशींच्या चांगलीच अंगलट आली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांनी हुर्यो उडवली तसंच जोशींना शिवीगाळही केली. त्यामुळं अपमानित होऊन जोशींना घरी परतावं लागलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.