मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी लागणार कुणाची वर्णी?

डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. येत्या ३० सप्टेंबर रोजी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी सेवानिवृत्त होत असल्यामुळं गृहखात्याला पोलीस दलात मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. त्याचवेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यावरही शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 25, 2013, 04:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. येत्या ३० सप्टेंबर रोजी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी सेवानिवृत्त होत असल्यामुळं गृहखात्याला पोलीस दलात मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. त्याचवेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यावरही शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.
राज्याच्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक श्रीदेवी गोयल सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. सत्यपाल सिंग यांना महासंचालकपदी बढती मिळणे अपेक्षित होतं. पण, आपलं राजकीय वजन वापरुन सत्यपाल सिंग यांनी या विषयाला बगल दिली आणि गृहखात्याला ते पद रिक्त ठेवणं भाग पडलं.
सत्यपाल सिंग यांच्या या खेळीमुळं मात्र मुंबई पोलीस आयुक्तपदी सेवा ज्येष्ठतेनुसार जावेद अहमद यांचं पद हुकलं. तर दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालकच सेवानिवृत्त होत असल्यामुळं आणि राज्याचे महासंचालक संजीव दयाल हे प्रतिनियुक्तीवर जात असल्यामुळं आणखी महासंचालकांची पदे रिक्त होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अरुप पटनाईक यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय आणि इतर महासंचालकांच्या रिक्त असलेल्या तीन पदांसाठी अनुक्रमे डॉ. सत्यपाल सिंग, के. पी. रघुवंशी आणि जावेद अहमद यांची वर्णी लागू शकते. परिणामी राज्याच्या महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक विजय कांबळे हे सेवा ज्येष्ठतेनुसार मुंबईचे पोलीस आयुक्त बनू शकतात.
मुंबईचे पोलीस आयुक्तपद आतापर्यंत सेवा ज्येष्ठतेनुसारच भरलं गेल्यास आणि त्या पदावर कांबळे यांची वर्णी लागल्यास त्यांना अडीच वर्षांचा काळ मिळू शकतो आणि राकेश मारिया यांचं मुंबईचे पोलीस आयुक्त बनण्याचं स्वप्न धुळीस मिळू शकतं. त्यामुळंच आयुक्त पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याची चर्चा आहे. मारिया यांना आयुक्तपदी बसवायचे असल्यास चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता गृहखात्याला नजरेआड करावी लागणार आहे.

पुण्याच्या आयुक्तपदी गुलाब पोळ यांना बसविताना राज्य सरकारनं सेवा ज्येष्ठता डावलली होती. मात्र मुंबईत घडत असलेले गंभीर गुन्हे लक्षात घेता मुंबईच्या आयुक्तपदासाठीही राज्य सरकार पुणे पॅटर्न वापरण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणूका लक्षात घेता मराठी कार्ड म्हणून विजय कांबळे यांना लॉटरी लागू शकते. तसंच गँगरेप, अॅसिड हल्ला, परदेशी महिलेवर हल्ला या घटना लक्षात घेता. सक्षम आणि धाडसी निर्णय घेणाऱ्या महिला अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याही नावाची मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी चर्चा आहे. त्यांची जर या पदावर वर्णी लागल्यास मुंबईच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त बनण्याचा मान मीरा बोरवणकर यांना मिळू शकतो. त्या सध्या अतिरिक्त महासंचालक तुरुंग या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
एकूणच काय नशीब आणि दिल्लीपर्यंत पोहोच असलेल्यांचीच मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी वर्णी लागेल असं ही काही अधिकारी खाजगीत म्हणतायेत. आगामी अधिवेशनाच्या आधी हा निर्णय होणार असल्याचं बोललं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.