मुंबई: सुशिक्षित आणि सुसंस्कृतांचे राज्य अशी ओळख असणारा महाराष्ट्र बलात्कारांची राजधानी बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्कार आणि विनयभंगाच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद गेल्या वर्षात महाराष्ट्रात झाल्याची माहिती केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी दिली.
लोकसभेत मनेका गांधी यांनी लेखी उत्तरातून देशात महिलांवर होणार्या अत्याचारांचा लेखाजोखा मांडला त्यात महाराष्ट्रातील ‘क्राइम रेट’सर्वाधिक असल्याचं स्पष्ट झालं.
२०१४ साली महाराष्ट्रात बलात्कार आणि विनयभंगाच्या १३ हजार ८२७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशात १३ हजार ३२३ तक्रारींची नोंद झाली. महिलांवरील अत्याचारांत आंध्र प्रदेश तिसर्या क्रमांकावर असून तिथं १३ हजार २६७ तक्रारी दाखल झाल्याचे मनेका गांधी यांनी सांगितलं.
महिलांवरील गुन्ह्यांत मुंबईही आघाडीवर
मुंबईतही महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे २०१३च्या तुलनेत २०१४ सालात वाढले. २०१३ सालात दोन हजार ९३४ गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये ६१६ गुन्ह्यांनी वाढ होऊन २०१४मध्ये तीन हजार ५५० गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये बलात्काराचे ६१०, अपहरणाचे ३०९ यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.