कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई : किडनीमध्ये झालेला जगातील सर्वात मोठा साडेपाच किलो वजनाचा ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात यश आलंय सायन रूग्णालयातील डॉक्टरांना. बिहारमधून आलेली २८ वर्षीय महिला गेली ३ वर्षे हा ट्यूमर घेवून उपचारासाठी फिरत होती. सात तास सलग शस्त्रक्रिया करून युरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी हा ट्यूमर बाहेर काढलाय.
१२५ ग्रँमची किडनी आणि त्यात साडेपाच किलोचा ट्यूमर...जगातील सर्वात मोठा किडनीत असलेला ट्यूमर...शंभर टाके आणि सात तास चाललेली शस्त्रक्रिया...आणि एका महिलेला जीवनदान
मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेली ही २८ वर्षीय महिला आहे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील. गेल्या तीन वर्षांपासून तिला उजव्या किडनीचा त्रास सुरू होता,त्याकडं दुर्लक्ष केल्यानं किडनीतील ट्यूमर मोठा होत साडेपाच किलोंचा झाला. बिहारमध्ये कुणी डॉक्टर एवढा मोठा ट्यूमर काढण्यास तयार होईना. त्यामुळं अखेर तिनं मुंबईतील सायन रूग्णालय गाठलं. इथल्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ अजित सावंत आणि त्यांच्या टीमनं सलग सात तास शस्त्रक्रिया करून किडनीतील साडेपाच किलो वजनाचा ट्यूमर यशस्विरित्या बाहेर काढला. या ट्यूमरने उजवी किडनी पूर्णत: डँमेज करत पूर्ण भाग व्यापला होता,तसंच हा ट्यूमर छातीपर्यंत पसरल्याने शस्त्रक्रियेवेळी छातीही ओपन करावी लागली, असे सायन रूग्णालयाचे डीन डॉ सुलेमान मर्चंट यांनी सांगितले.
या महिलेची उजवी किडनी निकामी झाली असली तरी डावी किडनी चांगली आहे. ७ नोव्हेंबरला तिच्यावर ही शस्त्रक्रिया केली असून तिची तब्येत आता ठणठणीत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी जेवूही न शकणारी ही महिला आता रोज जेवू लागली आहे, असे
सायन रूग्णालयाच्या युरोलॉजी विभागप्रमुख डॉ अजित सावंत यांनी सांगितले.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळं सायन रूग्णालयाचे नाव जागतिक पातळीवर नोंदवलं जाणाराय.