मुंबई : महाराष्ट्र सदन वादाप्रकरणातले शिवसेनेच्या खासदारांवर होत असलेले आरोप चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. शिवसेनेनं कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसून आंदोलन करत असल्यामुळेच हा कांगावा केला जात असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
महाराष्ट्र सदनात घडलेल्या प्रकाराला जाणिवपूर्वक धार्मिक रंग देऊन राजकारण केलं जात असल्याचा आरोप शिवसेना खासदारांनी केलाय. भाजपनंही याप्रकरणात शिवसेनेची पाठराखण केलीय. शिवसेना खासदारांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातल्या मुस्लिम केटरिंग सुपरवायजरला रमजान सुरू असताना चपाती खाऊ घातल्याच्या प्रकरणारे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटलेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शिवसेनेच्या दोषी खासदारांवर कारवाई करण्याची मागणी करत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं.
काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, जेडीयू आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला. तर दोषी खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केली. तर या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन राजकारण करण्यात येत असल्याचा दावा करत शिवसेनेनं आरोप फेटाळले आहेत. यावेळी हैदराबादचे आयएमआयए खासदार असादउद्दीन ओवेसी आणि भाजपचे खासदार रमेश विदुरी एकमेकांवर धावून गेले. त्यामुळं गोंधळात आणखीनच भर पडली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.