झी एक्सक्लुझिव्ह : कसा रचला जातो एसीबीचा सापळा, पाहा...

नांदेडच्या शेलगावच्या सरपंच शोभाबाई राऊत यांनी पाणी योजनेच्या कंत्राटासाठी एक लाख रूपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन करून त्यांना लाच घेताना 'एसीबी'नं म्हणजेच लाचलुचपत विभागानं रंगेहाथ अटकही केली. शोभाबाईंसारख्या लाचखोरांना एसीबी सापळा लावून कसं पकडतं... याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

Updated: May 29, 2015, 09:15 PM IST
झी एक्सक्लुझिव्ह : कसा रचला जातो एसीबीचा सापळा, पाहा... title=

मुंबई : नांदेडच्या शेलगावच्या सरपंच शोभाबाई राऊत यांनी पाणी योजनेच्या कंत्राटासाठी एक लाख रूपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन करून त्यांना लाच घेताना 'एसीबी'नं म्हणजेच लाचलुचपत विभागानं रंगेहाथ अटकही केली. शोभाबाईंसारख्या लाचखोरांना एसीबी सापळा लावून कसं पकडतं... याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून लाचखोराला अटक केल्याचं आपण ऐकतो... पण, असा सापळा रचताना एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी किती मेहनत घेतात, ते आम्ही तुम्हाला या उदाहरणावरून लगेचच लक्षात येऊ शकेल. 

नांदेडच्या पद्मजा हॉटेलमध्ये हा सापळा रचण्यात आला. पाणी योजनेचं ७५ लाखांचं कंत्राट मेसर्स पांडुरंग कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालं होते. त्याच्या अॅडव्हान्सच्या २० लाखांच्या धनादेशावर सही करण्यासाठी सरंपचबाईंनी एक लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र, सचिवांना लाच द्यायची नसल्यानं त्यांनी एसीबीकडं तक्रार केली. त्यानुसार हा सापळा लावण्यात आला. शोभाबाईंनी पैसे मोजून घेऊन पिशवीत ठेवताच, हॉटेलमध्ये साध्या वेषात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली. पण कोर्टात लाचखोरांविरूद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी एवढेचे पुरावे पुरेसे नसतात. 

यासाठी एसीबी सापळा रचण्याआधी लाचेच्या रकमेवर एक प्रकारची पावडर लावतात. लाच मागणाऱ्या व्यक्तीने पैसे घेताच त्याच्या हाताला ती पावडर लागते. हा एक शास्त्रीय पुरावाच लाचखोरांविरुद्ध मिळतो. लाचेची रक्कम लाचखोराला देण्याआधी, त्या सर्व नोटांचे नंबर एसीबी लिहून घेते आणि त्यांना शासकीय मोहर लावली जाते. आरोपींना अटक करताना आणि ते पैसे मोजताना घटनास्थळी असलेल्यांना पंच बनवलं जातं. आणि त्यांच्या समोर गुन्ह्याचा पंचनामा केला जातो.

अशा पद्धतीनं शास्त्रीय पुरावे, कागदोपत्री पुरावे, फोन रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, पंच आणि प्रत्यक्षदर्शी असे पुरावे आरोपीच्या विरुद्ध गोळा केले जातात आणि कोर्टात सादर करुन लाचखोराला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली जाते. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.