मुंबई : अखेर 'ते' बाळ वाडियामध्ये दाखल झालं आहे. 'झी २४ तास'च्या आवाहनानंतर, वेळेआधीच जन्माला आलेल्या आणि विचित्र दिसणाऱ्या या बाळाची संपूर्ण जबाबदारी आता वाडिया रुग्णालयानं उचलली आहे.
हॉस्पिटलनं एक स्पेशल अँम्ब्युलन्स पाठवून त्या बाळाला मुंबईत हलवलंय... बाळ त्याच्या आजोबांसह वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल झालंय... आता त्याच्यावर विविध चाचण्या करण्यात येणार आहेत... त्याला नेमका कोणता आजार झालाय, याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातील.
डहाणुमधील चळणी गावात एक लहान बाळ एका वेगळ्या आजारापासून त्रस्त आहे. त्याला तेरा दिवस झाले आहेत. सातव्या महिन्यात जन्मलेल्या या बाळाचं वजन फक्त ८०० ग्रॅम असून त्याची उंची अर्धा फूट आहे.
शिवाय या बाळाला जन्म देणारी आई त्याला आपल्या जवळही येऊ देत नाही. तसंच त्याला आपलं दूधही पाजत नाही. बाळाचे आजोबा जन्मापासून त्याला बकरीचं दूध बाळाचं संगोपन करतायत. बाळाचा चेहरा मात्र एका वृद्ध माणसासारखा दिसतोय. या बाळाला कुठला आजार आहे हे पाहण्यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील असंही डॉक्टरांनी सांगितलंय.
सामाजिक बांधिलकी जपत 'झी २४ तास'नं याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटलनं मदतीचा हात दिलाय. वाडिया हॉस्पिटल बाळावर मोफत उपचार करणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, शनिवारी या बाळाची ही कहाणी 'झी २४ तास'वर पाहिल्यानंतर या बाळासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघही सुरू झालाय. 'नेस वाडिया फाऊंडेशन' आणि 'अर्थ' या स्वयंसेवी संस्थांनी या चिमुरड्यासाठी मदतीचा हात पुढे केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.