दिल्ली पोलिसांकडून मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

दिल्ली बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं दिल्ली पोलिसांनी `झी न्यूज`विरोधात गुन्हा दाखल करुन प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या या कृतीचा राज्यभर निषेध केला जातोय. झी २४ तासचे पत्रकार काळ्या फिती लावून काम करत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 6, 2013, 02:55 PM IST

www.24taas.com,मुंबई
दिल्ली बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं दिल्ली पोलिसांनी `झी न्यूज`विरोधात गुन्हा दाखल करुन प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या या कृतीचा राज्यभर निषेध केला जातोय. झी २४ तासचे पत्रकार काळ्या फिती लावून काम करत आहेत.
दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या बातम्या आम्ही अत्यंत संयमानं दाखवल्या. या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करत यामधलं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. ते आम्ही केलं कारण आमचं ते कर्तव्य आहे. मात्र सत्य सांगण्याची किंमत आम्हाला मोजावी लागलीय.
दिल्लीतील पीडित तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं पोलिसांनी झी न्यूजवर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी चालवलेल्या या मुस्कटदाबीचा आम्ही आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं काळ्या फिती लावून निषेध करत आहोत.
आम्ही आमचं काम केलं.
पत्रकारितेचे सर्व विधीनिषेध पाळून आम्ही या पीडित तरुणाची कैफियत देशासमोर मांडली.काही गोष्टी देशवासियांसमोर ठेवायच्या, या उद्देशानं हा तरुण स्वतःहून झी न्यूजकडे आला आणि त्यानं त्याचं म्हणणं मांडलं. बलात्काराची घटना जितकी संतापजनक आहे, तितकीच पोलीस आणि नागरिकांनी दाखवलेली असंवेदनशीलताही संतापजनक आहे.

झी न्यूजवर गुन्हा दाखल करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या कृतीचा भाजपनं निषेध केलाय. दिल्लीत जंतरमंतरवर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दिल्ली पोलिसांनी माध्यमांच्या केलेल्या मुस्कटदाबीचा निषेध केला.
दुसरीकडे शिवसेनेनंही पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केलाय. दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणी तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं दिल्ली पोलिसांनी `झी न्यूज`च्या विरोधात एफआयआर दाखल केलाय.