www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या मिसींग मिस्ट्रीचा अखेर गोड शेवट झाला आहे. वाकोला भागातून गायब झालेल्या ६ मुली अखेर मुरबाडमध्ये सापडल्या आहेत. या पलायन नाट्यामागं पाल्य आणि पालक यांच्यातला विसंवाद असल्याचं बोललं जातं आहे.
मुंबईच्या वाकोला भागातले पालक त्यांच्या काळजाचा तुकडा पोलिसांनी परत मिळवून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. २२ तारखेपासून गायब झालेल्या मुली अखेर मुरबाडमध्ये सापडल्या. या मुली स्वेच्छेने घराबाहेर पडल्या होत्या. मुलींच्या पालकांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवली. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं.
वाकोल्याच्या शिवनगरमध्ये राहणाया सहा मुलींनी अगदी सुनियोजीत पद्घतीनं २२ मार्चला घरातून पलायन केलं होतं. मुंबईत काही ठिकाणी फिरल्यानंतर मुलींनी थेट पुणं गाठलं. पुण्याहून कर्जतमार्गे त्या मुरबाड तालुक्यातल्या टोकवडे या गावात गेल्या. यासाठी कर्जतमधल्या त्यांच्या एका मित्रानं त्यांना मदत केली. मुली शोधल्यानंतर एरवी कठोर वाटणाऱ्या पोलिसांनाही भावना अनावर झाल्या होत्या. मुलींच्या या अचानक गायब होण्यामागे पालक आणि मुली यांच्यात असलेला विसंवाद हेच प्रमुख कारण असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे मुलं आणि पालक यांच्यातील विसंवाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.