दिल्लीत कडाक्याची थंडी असल्यानं अण्णांनी मुंबईतून उपोषणास्त्र उगारण्याचं ठरवलंय. पण एमएमआरडीए मैदानाच्या भाड्याची रक्कम ४५ लाखांवर जाणार असल्यानं ते कमी करण्याची विनंती टीम अण्णांनी सरकारकडे केली आहे अन्यथा आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
लोकपालसाठी सरकारची धावाधाव सुरु असताना अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानाची निवड केली असली तरी MMRDAनं १५ दिवसांसाठी परवानगी देताना भाडंही आकारलंय. ३० हजार चौ मीटर जागेचं १५ दिवसांचं भाडं टॅक्ससह तब्बल ४५ लाखांवर जाणार असल्यानं कमर्शिअल भाडं आकारण्याऐवजी नाममात्र भाडे आकारण्याची विनंती टीम अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. यावरून अण्णांची टीम सरकारवर आगपाखड करतेय.
भाडं कमी केलं नाही तर आझाद मैदानावरच उपोषण करण्याचा इशारा टीम अण्णांनी दिलाय. वर आझाद मैदानात गर्दी वाढली तर सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच राहील असं सांगून सरकारवरच दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.