किंगफिशर एअरलाइन्सला सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यास प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जे आपल्या कर्माने मरणार आहेत, त्यांना मरू दिलेलेच बरे, अशी स्पष्टोक्तीही करण्यास बजाज विसरले नाहीत.
किंगफिशर एअरलाइन्स आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडली आहे. किंगफिशर'ला सरकारतर्फे आर्थिक मदत देण्याचे सूतोवाच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी काल केले होते. त्या पार्श्वाभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बजाज यांनी हे विधान केले.
आपण खासगी उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. ग्राहक किंवा कर्मचारी यांच्या भल्यासाठी खासगी क्षेत्रातील उद्योगाला सरकारतर्फे आर्थिक मदत देणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे बजाज म्हणाले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारतातील परिषदेला बजाज उपस्थित होते. या वेळी एका वृत्तवाहिनीशी बजाज बोलत होते.
बजाज ऑटो' आर्थिक संकटात सापडल्यास माझ्या कंपनीला सरकार मदत करणार का, असा प्रश्नही बजाज यांनी उपस्थित केला. विमान कंपन्यांवर सरकारने लादलेल्या वाढीव कराबाबतया वेळी बजाज यांनी नाराजी व्यक्त केली.