www.24taas.com, मुंबई
मंत्रालयाला लागलेल्या आगीची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. क्राईम ब्रँचवर विश्वास नसल्याचंही खडसेंनी यावेळी सांगितले.
मंत्रालयाला लागलेली आग हा अपघात नसून घातपात आहे. तसंच बेकायदा जमिनीच्या परवानगगी फाईल्स, मुंबई - पुण्यातले भूखंड घोटाळ्याच्या फाईल्स, राज्य सहकारी बँकेच्या संचालकांविरोधातल्या कारवाईच्या फाईल्स जळाल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. लवासाची फाईल, हिरानंदानी भूखंड घोटाळ्याचीही फाईल आगीत स्वाहा झाली आहे. जर मंत्रालयच सुरक्षित नाही तर सामान्यांचं काय ? असा सवालही खडेसेंनी उपस्थित केलाय.
तर दुसरीकडे विधानपरिषदेत मंत्रालय अग्नितांडवप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि बांधकाम मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना आणि भाजप आमदारांनी केलीय. मंत्रालय अग्नितांडवप्रकरणी विरोधकांनी चर्चेवेळी आक्रमक सूर लावला.