www.24taas.com, मुंबई
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर पकडण्यात आलेला २६/११ मुंबईतील हल्ल्यातील कुख्यात दहशतवादी सैय्यद जबीउद्दीन अबू जिंदाल तथा अबू हामजा हा महाराष्ट्र सरकारमधील आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या निवासस्थानी राहीला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्याला याप्रकरणी गृहमंत्रालयाने क्लिन चीट दिल्याचे फौजिया खान यांनी म्हटले आहे. मात्र, मी कोणत्याही चौकशीस सामोरे जाईन, असे खान यांनी म्हटले आहे.
मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातला आरोपी अबू हमजाच्या चौकशीसाठी मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसची टीम दिल्लीला जाणार आहे. अबू हमजा हा गेल्या काही वर्षापासून फरार होता. दरम्यान, अबू हमजा हा बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे. तो सैयद जबीउददीन उर्फ अबू जिंदाल या नावानेही ओळखला जातो. सैय्यद जबीउद्दीन अबू जिंदाल हा आमदार निवासातील फौजिया खान यांच्या रूममध्ये राहिल्याचे पुढे आले आहे.
हामजा याच्या अटकेनंतर आता फौजिया खान अडचणीत आल्या आहेत. खान या राज्यमंत्रीमंडळात असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, फौजिया खान यांनी म्हटले आहे की, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. आपण अबू हामजा अशा व्यक्तीला ओळखत नाही. आमदार निवासात राहण्यास खूप लोक येत असतात. त्यामुळे प्रत्येकाला ओळखने कठीण असते. त्यामुळे खान यांची पुन्हा चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
हमजा हा इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर ए तोएबा या दोन दहशतवादी संघटनांचा दहशतवादी असल्याचा संशय आहे. मुंबईवरील हल्ल्यावेळी हमजा हा पाकिस्तानात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलीय. अबू हमजा हा गुजरातमधील स्फोटांप्रकरणीही आरोपी आहे. दिल्ली पोलिसांनी हमजाला कोर्टासमोर हजर केलं असून त्याचा १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. मुंबईतल्या रेल्वे बॉम्बस्फोटप्रकरणातही त्याचा हात असल्याचा संशय आहे.