www.24taas.com, वांगणी
वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पँटाग्राफ जळून ओव्हरहेड वायर तुटल्याने झालेल्या अपघात तीन प्रवासी जखमी झालेत. जखमींना कल्याण आणि बदलापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातस्थळी रेल्वे अधिकारी पोहोचले असून घटनेची माहिती घेत आहेत.
कर्जत - सीएसटी या लोकलच्या दरवाजात उभे असलेले तीन प्रवासी जखमी झाले. ओव्हरहेड वायर तुटून विलास दत्तू हा प्रवासी जखमी झाला. त्याला कल्याण रेल्वे रुग्णालयात दाखल केले आहे. अन्य दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.दरम्यान, उद्यान एक्सप्रेस ही कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आली. त्यामुळे मुंबईहून अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोलीकडे जाणा-या डाऊन लोकललाही मोठा अडथळा निर्माण झाला, पर्यायाने अप मार्गावरून धावणा-या लोकलचेही वेळापत्रक कोलमडले आहे. मुलुंडहून सीएसटीला जाण्यासाठी दोन तास लागल्याचे प्रवाशांनी सांगितले.
मुंबईहून पुण्याकडे जाणा-या रेल्वेमार्गावरील वांगणी स्टेशनजवळ सकाळी साडेसात वाजता पँटाग्राफ जळून ओव्हरहेड वायर तुटल्याने पुण्याकडे जाणा-या एक्सप्रेस गाड्या कल्याण ते अंबरनाथ- बदलापूर मार्गावर खोळंबल्या. मुंबईहून पुण्याकडे जाणारी डेक्कन एक्सप्रेस ही अंबरनाथ- बदलापूर दरम्यान थांबवण्यात आली होती. सुमारे दोन तासानंतर १०.३५ ला ही गाडी पुण्याकडे रवाना झाली. तर सीएसटीकडे येणारी डेक्कन क्वीन अर्ध्या तासानंतर कल्याणला स्लो ट्रॅकवरुन वळवण्यात आली. याचा फटका उपनगरीय गाड्यांनाही बसला असून लोकलचाही खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उपनगरीय रेल्वे दोन ते अडीच तास उशीराने धावत आहेत.
संबंधित आणखी बातमी
मध्य रेल्वे सुरळीत, एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या