www.24taas.com, मुंबई
केंद्रातल्या काँग्रेसच्या कारभारावर नाराज असलेल्या राष्ट्रवादीनं राज्यातही मुख्यमंत्र्यांविरोधात मोहीम उघडली आहे. राज्यातलं नेतृत्व बदल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसवर दबावाचं राजकारण सुरू केलं आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचा रोख असून त्यांना हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न राष्ट्रवादीनं सुरू केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या धुसफूस सुरु आहे.. त्याचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळू शकतात. मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केलेल्या जाहीर नाराजीमुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतली दरी वाढलीय. त्यामुळं अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री गैरव्यवहारांच्या आरोपात अडकलेत. त्यातच काँग्रेसकडून राष्ट्रवादीला विशेष सहकार्य मिळताना दिसत नाही... त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या कुरबोरींचा फायद घेत विरोधक सभागृहात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विरोधक यावेळी गैरव्यवहारात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना टार्गेट करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले जात आहे. तसे संकेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुण्यात बोलताना दिले आहेत.