www.24taas.com, मुंबई
कांदा, दूध आणि बेदाण्याला रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी थेट विधान भवनावर धडक मोर्चा नेलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विधान भवनासमोर रस्त्यावर दूध ओतण्यात आलं. तसंत कांदा आणि बेदाणेही भिरकावण्यात आले. यावेळी राजू शेट्टींना पोलिसांनी धक्काबुक्की केली. राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा धिक्कार केला.
केंद्र सरकारने लादलेले निर्यातमूल्य शून्य करून वाहतुकीपोटी प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान द्यावे , सरकारने जाहीर केलेल्या किमान ८७९ रुपये आधारभूत किंमतीत कांदा खरेदी करावा , या मागण्यांसाठी खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
काल मुंबई-आग्रा हायवेवर ‘ चक्का जाम ’ केल्यानंतर आज राजू शेट्टी आणि त्यांचे समर्थक थेट विधानभवनावर येऊन धडकले. सारं सुरळीत सुरू असताना, दुपारी एकच्या सुमारास विधानभवनाच्या प्रवेशद्वाराशी शेतकरी संघटनेचे ७०-८० कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी पोत्यांमधून कांदे-बेदाणे फेकायला आणि दूध ओतायला सुरुवात केली.
योग्य किंमत देणार नसाल, तर हे सगळं फुकटच घ्या, अशा घोषणा देत त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. हा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. त्यांनी राजू शेट्टींसह सर्वच कार्यकर्त्यांना अटक करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागली. महागाई वाढत चालली असताना कांद्याचे भाव गडगडले आहेत. अशावेळी कांद्याला आधारभूत किंमत देऊन सरकारनं कांदा उत्पादकांना आधार द्यायला हवा. पण, तसं कुठलंच पाऊल सरकार उचलत नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.