'शिवसेना अफझलच्या फाशीची मागणी करेल का?'

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्यानं भाजप-सेनेत निर्माण झालेला तणाव कायम आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या भाजपच्या मागणीला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Updated: Jun 20, 2012, 08:42 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्यानं भाजप-सेनेत निर्माण झालेला तणाव कायम आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या भाजपच्या मागणीला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे 'अफझल गुरुला फाशी देण्याची मागणी शिवसेना प्रणवदांकडे करेल का?' असा सवाल करत भाजपनं आज शिवसेनेला डिवचलं.

 

शिवसेना भाजपमधला संघर्ष आता तीव्र झालाय. मैत्रीचा धर्म सोडून शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला आणि एनडीएत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा वाद उफाळला तेव्हा या पदासाठी सर्वसमावेशक उमेदवार नसल्याचा निशाणा शिवसेनेनं भाजप नेतृत्वावर साधला.

 

शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपमधून प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली, पण बुधवारी सकाळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णयाचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं. शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा मुनगंटीवार यांनी अफझल गुरूच्या फाशीचा मुद्दा पुढे करत सेनेला डिवचलं.

 

गेल्या काही वर्षांत शिवसेना-भाजपमधला छुपा संघर्ष पहायला मिळाला. भाजपशी मनसेशी जवळीक आणि शिवसेनेचं खच्चीकरण करण्याची रणनीती यामुळे शिवसेनेचा भाजपवर रोष होताच. आता संधी साधून शिवसेनेनं भाजपला शह देण्याचा प्रयत्न केलाय. पण काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणंच या दोन्ही पक्षांची भिस्त एकमेकांवर अवलंबून असल्यानं कितीही संघर्ष झाला तरी त्याचा युतीवर परिणाम होईल, अशी शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.