www.24taas.com, चंद्रपूर
एका कुटुंबाला एका वर्षात फक्त सहा सिलिंडरवर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय. या निर्णयामुळं एकत्र राहणाऱ्या कुटुंबांचं कंबरडचं मोडलंय. याचा फटका जसा सामान्य माणसाला बसलाय तसाच आनंदवनसारख्या सामाजिक प्रकल्पांनाही बसलाय.
‘आनंदवन’मध्ये सतराशेहून अधिक कुष्ठरुग्ण तसेच कर्मचारी मिळून अडीच हजार लोक एकत्र नांदतात. आनंदवनला रोज साधारणपणे २० सिलेंडर्स लागतात. सरकारच्या नव्या सिलेंडर्स धोरणामुळं आनंदवनला वर्षाला फक्त सहा सिलिंडर्स अनुदानीत मिळणार आहेत. तर तब्बल ८ हजार १५४ सिलिंडर्स बाजारभावाप्रमाणे खरेदी करावी लागणार आहेत. यासाठी वर्षाकाठी तब्बल ५० लाख रुपये अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांबाबत सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आनंदवनातील महारोगी सेवा समितीचे सचिव कौस्तुभ आमटे यांनी केलीय.
बाबा आमटे यांनी स्थापन केलेली आनंदवन ही सेवाभावी संस्था गेली ६३ वर्ष कुष्ठरोग्यांसाठी काम करतेय. पण, सहा अनुदानित सिलिंडरच्या निर्णयामुळे ‘आनंदवन’सारख्या इतर हजारो सेवाभावी संस्थांचं दिवाळं निघणार आहे. देशभरात कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, वृद्ध, निराधार व परित्यक्ता तसेच मतिमंदांसह विविध क्षेत्रात सेवाभावानं काम करणाऱ्या हजारो संस्थांसमोर केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.