रुढींची होळी, चळवळीची पुरणपोळी!

होळी साजरी करतांना त्यासोबत आपल्या पारंपारिक रूढी आणि संकल्पनाही पाळल्या जातात. मात्र अशा रुढी-परंपरांना छेद देत अकोल्यातल्या एका शिक्षकानं समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 27, 2013, 07:14 PM IST

www.24taas.com, अकोला
होळी साजरी करतांना त्यासोबत आपल्या पारंपारिक रूढी आणि संकल्पनाही पाळल्या जातात. मात्र अशा रुढी-परंपरांना छेद देत अकोल्यातल्या एका शिक्षकानं समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
होळीला पुरणपोळीचा नैवद्य दाखविण्याची परंपरा महाराष्ट्रात पूर्वापार चालत आली आहे. पुरणपोळी होळीत जळाल्यानंतर मात्र तिची राख होते. मात्र नेमकी हीच भावना बारा वर्षांपूर्वी अकोल्यातल्या गणेश कावरे या शिक्षकाला अस्वस्थ करून गेली. या अस्वस्थतेतूनच जन्माला आली एक चळवळ. होळीचा नैवैद्य, पुरणपोळी अग्नीत जाळण्याऐवजी ती गरीब आणि वंचितांना वाटायची. बारा वर्षांपूर्वी अकोल्यात सुरु झालेला हा उपक्रम आता राज्याच्या सीमा ओलांडत परराज्यातही सुरु झाला आहे.

गणेश कावरेंच्या या उपक्रमाचा गोडवा वंचितांनाही चाखायला मिळतोय. गरीबांच्या चेहऱ्यावरचा आनंदच या उपक्रमाचं यश सांगतोय. जाळण्यापेक्षा भुकेल्यांच्या पोटाची आग शांत करण्याचा मंत्र देणारी ही चळवळ निश्चितच प्रेरणादायीच म्हणावा लागेल.