www.24taas.com , झी मीडिया, नागपूर
आयुष्याची उमेदीची वर्ष सैन्यात देशसेवेसाठी खर्च केलेल्या जवानांना निवृत्तीनंतर हालाखीत जगावं लागतंय. अपुरं पेंशन, रोजगाराच्या कमी होत चाललेल्या संधी यामुळं त्यांच्या अडचणीत भर पडलीय. सरकारप्रमाणं समाजानंही आम्हाला सन्मान द्यावा अशी मागणी हे सैनिक करत आहेत.
नागपुरच्या कृष्णा हाडके यांनी १९६२ आणि १९६५च्या युद्धात देशाच्या शत्रूंचा सामना मोठ्या हिमतीनं केला. तळहातावर शीर धरुन देशाची सेवा करणाऱ्या हाडके यांना निवृत्तीनंतर आपलं आयुष्य सुखात जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. सध्या मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात घर चालवणं त्यांना अशक्य होतंय. त्यातच मुलाच्या नोकरीची चिंताही हाडके यांना सतावतीय. त्यामुळं गुणवत्ता कोठंही कमी न करता आपल्या मुलांना सेनेच्या नोकरीत आरक्षण मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
मनोहर भातुलकर यांचीही काहीशी अशीच व्यथा आहे. उमेदीची 15-20 वर्ष सैन्यात घालवली. मात्र तरीही समाजात फारसा मान मिळत नाही अशी खंत त्यांना सतावतीय. सातारा, कोल्हापूर सारख्या काही शहरात निवृत्त सैनिकांना मालमत्ता करात सूट मिळते, ती सूट राज्याच्या इतर शहरात मिळावी ही मागणी देखील त्यांनी केलीय.
सरकारनं या सर्व माजी सैनिकांकरता योजना सुरु केल्या आहेत. पण त्या पुरेशा नाहीत. मात्र सरकारप्रमाणंच समाजानंही त्यांच्या समस्यांबद्दल जागरूक असणं तितकंच आवश्यक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.