www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
राज्यभरातले 70 टक्क्यांपेक्षा जास्त महसूल कर्मचा-यांनी आपल्या 24 प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय. या संपामुळे पेन्शन, उत्पनाचा दाखलाकरता येणा-या सामान्य नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागतायत. तर अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदत करण्यासंबंधीच्या कामावरही याचा परिणाम होतोय.त्यामुळे हा संप कधी मिटणार असा सवाल सामान्य नागरिक विचारतायत.
77 वर्षांचे शिवरतन श्रीवास आपल्या पेन्शनच्या कामासाठी नागपूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आले होते. पण महसूल विभागातल्या कर्मचा-यांच्या संपामुळे आजोंबाना आज हेलपाटा पडला. असा हेलपाटा झालेले ते काही एकटेच नाहीत. तर आज अनेक जणांना काम न होताच घरी जावं लागलंय.
संपामुळे उत्पनाचा दाखला मिळ्ण्यासारखी अनेक महत्वाची कामंही रखडलीत.यातच, हा संप कधी सुटणार याची कुठलीच चिन्ह दिसत नसल्याने सर्वच चिंताग्रस्त आहेत.
महसूल विभागतले 70 टक्यांपेक्षा जास्त कर्मचारी आपल्या 24 मागण्यांसाठी सध्या संपावर आहेत. सरकारला या प्रकरणी नोटीसही बजावली होती, पण परिणाम काहीच झाला नाही असा संपकरी कर्मचा-यांचा दावा आहे. हे आंदोलन राज्यव्यापी असल्यानं याबाबतचे सर्व निर्णय मुंबईतच होतील असंही हे कर्मचारी सांगतायत.
विदर्भात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतीमध्ये झालेल्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरु आहे. आस्मानी आपत्तीनं त्रस्त असलेल्या शेतक-यांना आता संपाच्या निमित्तानं सुलतानी संकटांचा सामना करावा लागतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.