बाबा-दादांमध्ये पवारांच्या वाढदिवसाने ‘गोडवा’

केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं नागपूर विधान भवन परिसरात सेलिब्रेशन करण्यात आलं.. यावेळी १२ वाजून १२ मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून पवारांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गोडवा वाढला तो बाबा आणि दादांमध्ये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 12, 2012, 08:09 PM IST

www.24taas.com,नागपूर
केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं नागपूर विधान भवन परिसरात सेलिब्रेशन करण्यात आलं.. यावेळी १२ वाजून १२ मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून पवारांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गोडवा वाढला तो बाबा आणि दादांमध्ये.
बाबा आणि दादांच्या गोडव्याला साक्षीदार होते, गृहमंत्री आर.आर.पाटील, तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार . यावेळी दोन्हीकडच्या मंत्र्यांना एकमेकांवर जे प्रेमाचे ऊतू जात होते. ते टीपण्यासारखे होते. गुलाबी थंडीतही थंड केक एकमेकाला भरवून गोडवा वाढवण्याचा प्रयत्न चालला होता. त्यात बाबा आणि दादांनीही एकमेकांचे तोंड गोड केले. त्यानंतर सगळ्यांनी मेजवानीवरही ताव मारला. यावेळी पवारांचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलीय.

शरद पवार यांना कालच ब्रीच कँडी रुग्णालायातून डिसचार्ज मिळाला. त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे यंदा पवारांच्या वाढदिवसाला विशेष असा काही कार्यक्रम नव्हता. ही उणीवच जणू नागपूरवारीवर असलेल्या मंत्री महोदयांनी भरून काढली. अधिवेशन चालू असले तरी वेळात वेळ काढून विधिमंडळाच्या हिरवळीवरच आज वाढदिवसाचा खास बेत आखण्यात आला होता.
केकवर १२-१२-१२ तसेच शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे लिहिले होते. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे झाडून सगळे मंत्री यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे अन्य मंत्रीही या बर्थ डे सेलिब्रेशनला खास निमंत्रीत होते. यांच्याच उपस्थित केक कापण्यात आला.