नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी

नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु असतानाच शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढलंय. महाविद्यालयांमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर झी २४ तासनं प्रकाशझोत टाकल्यानंतर महाविद्यालयांबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली असून नाकाबंदी करण्यात येत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 23, 2012, 10:24 PM IST

www.24taas.com, नाशिक
नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु असतानाच शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढलंय. महाविद्यालयांमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर झी २४ तासनं प्रकाशझोत टाकल्यानंतर महाविद्यालयांबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली असून नाकाबंदी करण्यात येत आहे.
मात्र दुसरीकडे टोळक्यांचा उच्छाद सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजी चौकात आर्थिक वादातून दीपक शेवरे या तरुणाचा खून झाल्यानंतर दुस-याच दिवशी भद्रकाली परिसरात पूर्ववैमनस्यातून हाणामारी होत एकावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरत तणाव निर्माण झाला असून पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.
संभाजी चौकातील खून प्रकरणी मुख्य संशयिताला आणि भद्रकालीतील हल्ला प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलण्याची मागणी होत आहे.