राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जॉगिंग ट्रॅकचा बळी?

नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कची लांबी वाढवण्यासाठी जागा अधिग्रहित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी मनसेचे नगरसेवक एका जॉगिंग ट्रॅकचा बळी देण्याच्या तयारीत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 14, 2013, 06:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कची लांबी वाढवण्यासाठी जागा अधिग्रहित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी मनसेचे नगरसेवक एका जॉगिंग ट्रॅकचा बळी देण्याच्या तयारीत आहेत. या जॉ़गिंग ट्रॅकवर टप-या थाटण्याचा त्यांचा विचार आहे. नाशिककरांचा मात्र याला कडाडून विरोध आहे.
ही अवस्था आहे उपनगर परिसरातल्या जॉगिंग ट्रॅकची.. आता याच जॉगिंग ट्रॅकवर टपरी झोन तयार करण्याचा सत्ताधारी मनसेच्याच नगरसेवकांचा प्रस्ताव आहे. रस्ता रुंदीकरणात ज्या टप-या अडसर ठरतायत, त्या उचलायच्या आणि जॉगिंग ट्रॅकवर आणून बसवण्याचा घाट घातला जातोय.
जॉगिंग ट्रॅकवर गवत आणि घाणीचं साम्राज्य वाढलंय. रात्रीच्या वेळी इथे दारूपार्ट्या झडतात. त्यामुळे निरुपयोगी ठरणा-या ट्रॅकवर टपरी झोन केला, तर बिघडलं कुठे असा उलटा सवालही नगरसेवक करतायत. स्थानिकांचा मात्र याला कडाडून विरोध आहे.
मुळात जॉगिंग ट्रॅकची अशी अवस्था केलीच कुणी? जॉगिंग पार्क दारुड्यांचा अड्डा होण्याला जबाबदार कोण? हे पार्क नीट मेंटेन का झालं नाही? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच..... महापालिकेतले सत्ताधारी.... अर्थात मनसे.....
मुळात या पार्ककडे नीट लक्ष दिलं नाही, आणि आता जो काही ट्रॅक उरलाय, त्यावरही टप-या बसवण्याचा घाट घातला जातोय. आता जॉगिंग ट्रॅकला अतिक्रमणाच्या बजबजपुरीतून वाचवण्यासाठी कोर्टात लढा देण्याची तयारी नाशिककर करताय. जाण्याची आधी हा ट्रॅक नीट करुन द्या, नाही तर न्यायालयात लढाई लढण्याचा इशारा नाशिककरांनी दिलाय.
ट्रॅकवर दारुडे, गर्दुल्ले पार्ट्या झोडतात त्यामुळे नागरिक फिरकत नाही हा सत्ताधाऱ्यांचा दावा प्रशासनचं नाकर्तेपणा सिध्द करणारा असल्यानं टपरी झोन नाही, तर ट्रॅक स्वच्छ करून पूर्ववत उपलब्ध करून द्या अशी मागणी होतेय. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत नागरिक आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.