www.24taas.com, नाशिक
नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय. मनपा आयुक्त पालकमंत्र्यांच्या दबावाखाली मनसेला असहकार्य करत असल्याचा आरोप सत्ताधा-यांनी केल्यानं पाण्यावरून पुन्हा एकदा रणकंदन माजण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
पावसाळा मध्यावर येवून ठेपलाय. शहराला पाणी पुरवठा करणा-या गंगापूर धरणातील पाणी साठ्याने 80 टक्क्याचा टप्पा पार केल्यानं सात हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आणि नाशिककरांनी मागील आठवड्यात गोदामाई खळखळून वाहताना पाहिली. गोदावरीला पूर आला मात्र नागरिकांच्या घरात एक वेळ आणि तोही कमी दाबानेच पाणी पुरवठा होतंय.त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनंतर महापौरांनी आधी एक वेळ मुबलक आणि नंतर दोन वेळा पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेला प्रशासकीय अधिका-यांनी वाटण्याच्या अक्षता दाखविल्या. सहा दिवस उलटून गेले तरीही शहरातील पाणी कपात रद्द झाली नसल्यानं सत्ताधारीच हतबल झालेत. पालकमंत्र्यांच्या दबावामुळेच मनपा आयुक्त महापौरांच्या शब्दाला किमत देत नसून प्रशासनाला मनसे स्टाईल धडा शिकविण्याचा इशारा गटनेते देतायेत.
शहरात घाणीच्या साम्राज्या बरोबर साथीचे आजार आणि रुग्ण वाढलेत. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जुमानत नसल्यानं उपमहापौरांनी मागच्याच आठवड्यात उद्विग्न होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मनसेवरही तीच वेळ आल्यानं सत्ताधा-यांमध्ये प्रशासन चालविण्याची धमक नसल्याचा आरोप केला जातोय..त्या नैराश्येपोटी पालकमंत्र्यावर आरोप केले जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला असून प्रशासनावर अंकुश ठेवता येत नसेल तर महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय.
ऐन उन्हाळ्यात नाशिकरांवर पाणी कपात लादून जायकावाडीला पाणी सोडण्यावरून चांगलच रणकंदन माजलं होतं. आता गंगापूर धरणात ८० टक्के पाणी आहे. पाणी कपात रद्द करण्याची घोषणाही कऱण्यात आलीय..मात्र नाशिकरांच्या तोंडाला पान पुसली जातायेत. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या साठमारीत धरणात तुडुंब पाणी दिसत असूनही पाण्याच्या प्रतीक्षेत दिवस काढण्याची वेळ नाशिकारांवर आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.